

आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघड; सहा आरोपी जेरबंद
३९० किलो शिशाच्या विटांसह १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात अट्टल चोरट्यांच्या टोळीतील सहा आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या १६ शिशाच्या धातूच्या विटा (३९० किलो) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कंपनीतून ५०० किलो शिशाच्या विटांची चोरी
३१ ऑगस्टच्या रात्री ९ ते १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान चोरट्यांनी श्री आनंद बॅटरी कंपनीच्या सिमेंट कंपाऊंडला असलेली जाळी तोडून कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २० शिशाच्या धातूच्या विटा, एकूण ५०० किलो वजनाच्या, चोरून नेल्या होत्या.
याप्रकरणी कंपनीचे मालक लखन वासुदेव बुधानी (रा. कंवर नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(३), ३३४(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
सहा आरोपींचा समावेश
पोलिसांनी आसिफ शहा सिकंदर शहा, मोहसीन शाह सिकंदर शाह, महेश उर्फ बापू संतोष भोई, मुकेश राजू परमार, शेख आबिद शेख मोहम्मद आणि शकील शहा रुबाब शहा, सर्व रा. तांबापुरा परिसर, जळगाव, यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून ३९० किलो वजनाच्या १६ शिशाच्या धातूच्या विटा आणि ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.



