

जळगाव जिल्ह्यातून नशिराबादचे ६ सराईत हद्दपार; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश
नशिराबाद प्रतिनिधी
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवायांद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव विभाग यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ५६ अन्वये हे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे उपक्रमातील उपद्रवी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये अताउल्ला उर्फ मायाबाई अमानुल्ला शहा, मुक्तार शहा खलील शहा, अक्रम शहा सादिक शहा, रोहित दिलीप नाथ, विपुल गोविंदा नाथ आणि आवेश उर्फ काल्या शेख जहांगीर (सर्व रा. नशिराबाद) यांचा समावेश आहे.
या इसमांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांच्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत होता. यावर प्रतिबंध घालण्यासाठी नशिराबाद पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत दंडाधिकाऱ्यांनी त्यांना वर्षभरासाठी तडीपार केले. आदेशाचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केल्यास थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, भरत बाविस्कर व पंकज सोनवणे यांच्या पथकाने बजावली.




