
जळगावच्या भूषण ठाकरेने केबीसीत जिंकले एक कोटी रुपये !
खिशात होते अवघे २४ रुपये; वडिलांच्या कष्टांचे केले चीज

जळगाव I खानदेश टाइम्स न्यूज : आई-वडिलांनी केलेल्या कष्टांचे चीज करत जळगाव जिल्ह्यातील बलवाडी येथील २८ वर्षीय भूषण ठाकरे याने ‘कौन बनेगा करोडपती’च्या (केबीसी) १८ व्या पर्वात एक कोटी रुपये जिंकण्याची कामगिरी केली आहे. या पर्वातील तो पहिला करोडपती ठरला आहे. एकेकाळी खिशात अवघे २४ रुपये घेऊन मुंबईत आलेल्या भूषणच्या यशाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
भूषणचे वडील रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर आईची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. आर्थिक अडचणी असूनही आई-वडिलांनी भूषणच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. स्वतः कष्टाची कामे करणाऱ्या वडिलांनी मुलाने मात्र मजुरी करण्याऐवजी शिक्षण घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे, अशी अपेक्षा ठेवली.
वडिलांच्या कष्टांची जाणीव असलेल्या भूषणने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. प्रवेश न मिळाल्याने तो घरी राहून अभ्यास करत होता. वडिलांना दररोज कष्ट करताना पाहून त्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी गावातील नदीवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र, वडिलांनी त्याला मजुरी करण्यापासून रोखले आणि शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. मुलानेही आपल्याप्रमाणे कष्टाचे आयुष्य जगू नये, हीच त्यांची इच्छा होती.
दीड वर्षांपासून घरी परतला नव्हता
भूषणने केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. आई-वडिलांनी आपल्यासाठी खूप त्याग केला; मात्र त्यांच्या कष्टांचे चीज होईल, असे यश अद्याप मिळवता आले नाही, अशी भावना त्याच्या मनात होती. त्यामुळे आयुष्यात काहीतरी मोठे साध्य केल्यानंतरच घरी परतण्याचा त्याने निर्धार केला होता. जवळपास दीड वर्षांपासून तो घरी परतला नव्हता.
एक कोटींचा टप्पा पार; सात कोटींच्या प्रश्नाची उत्सुकता
सोनी टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये भूषण एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देताना दिसत आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याला मिठी मारून अभिनंदन केले. आता सात कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाचे उत्तर देण्यात भूषण यशस्वी ठरतो का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या भूषणने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आई-वडिलांच्या त्यागाला यशाची जोड देणाऱ्या भूषणच्या कामगिरीमुळे बलवाडीसह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.




