खान्देश टाइम्स न्यूज | २६ जून २०२३ | मे महिन्याच्या अखेरीस रावेर येथील दोन गोदाममध्ये अवैद्य धान्यसाठा आढळून आला होता. या प्रकरणात चौकशीअंती दहा दिवसानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गेल्या दोन दिवसात सील केलेले धान्य गोदाम उघडण्यासाठी जलद गतीने आर्थिक हालचाली झाल्या असून गोदाम उघडले जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या तपासणीत दि.३१ रोजी रावेर शहरातील बर्हाणपूर रस्त्यावरील दोन खाजगी गोदामात धान्याचा अवैधसाठा आढळुन आल्याने हे गोदाम सिल करण्यात आले होते. मागील दहा दिवसात या प्रकरणी अहवाल व चौकशी करण्यात आल्यानंतर दि.१० जून रोजी पुरवठा अधिकारी डी.के.पाटील यांनी रावेर पोलीस स्थानकात येऊन फिर्याद दिली आहे.
यामध्ये आरोपी गणेश देवराम चौधरी रावेर यांच्या चौधरी ट्रेडर्स नावाच्या गोदामात एकूण ७ लाख ७७ हजार २०० रुपयांचा धान्यसाठा आढळुन आला. यामध्ये ९७ गहू कट्टे; २०८ तांदुळाचे कट्टे; ११ ज्वारी कट्टे; १८० मका कट्टे आणि १७,२५० बारदान आढळले. तर संशयित आरोपी मो. रिहान शेख मोईम (रा नागझिरी मोहल्ला) यांच्या गोदामामध्ये २७,४५० रुपये किमतीचा माल यात ८ गहु कट्टे १७ तांदळाचे कट्टे असा एकूण दोघे गोदामा मध्ये आठ लाख ०४ हजार ६५० रुपये किमतीच्या धान्याचा अवैध साठा मिळून आला.
या अनुषंगाने रावेर पोलिस स्टेशनला जिवनावश्यक कायदा १९५५ कलम ३ व ७ प्रमाणे दोन्ही संशयित आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहेत.
गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणात काही दिग्गजांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सील गोदाम लवकरात लवकर खुले करून देण्यासाठी एका ठेकेदाराने महसुलींना मोठा ‘धन’लाभ करून दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. लाभार्थ्यांचा ‘राज’ खुलणार की शासकीय योजनांच्या जत्रेत गोदाम खुलणार हे पाहणे मोठे औत्सुक्याचे आहे.
गोदाम खुले करण्याचे अधिकारी सध्या प्रांताधिकाऱ्यांना असल्याची माहिती आहे. ३० जूनचा मुहूर्त साधण्याच्या गडबडीत चौधरी आणि शेख यांना लाभ होईल किंवा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे त्याकडे लक्ष जाईल हे देखील पहावे लागणार आहे.