सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सज्ज राहा -पोलीस अधीक्षक एम राजकुमार
जळगाव : – आगामी सणोत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सज्ज राहा अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी रविवारी सर्व पोलीस अधिकाऱयांच्या आयोजित बैठकीत केल्या. ते म्हणाले कि ज्याप्रमाणे गणेशोत्सव सुरक्षितरित्या पार पडला त्याप्रमाणेच आता उपाययोजना आवश्यक आहे. त्यात सण-उत्सवासोबतच ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले .
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारी आढावा व उपाययोजना याविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीला पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांविषयी माहिती घेण्यासह उत्सव काळात बंदोबस्ताच्या आखणीसाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भांत सूचित करण्यात आले. येत्या काळात त्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात ज्या पद्धतीने काळजी घेण्यात आली, तशीच काळजी आता नवरात्रोत्सव काळातदेखील अपेक्षित असल्याचे पोलिस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.
येत्या काळात जिल्ह्यात ज्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका आहेत, त्या ठिकाणी सण-उत्सव काळात योग्य सांगड घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सज्ज राहा, असेही यावेळी सांगण्यात आले. यासोबतच समन्स, वारंट बजावणी व अन्य विषयांचादेखील आढावा घेण्यात आला.