जळगांवधार्मिकसामाजिक

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांसोबत मंडळांची देखील : अपर पोलीस अधीक्षक

पोलिसांनी घेतली दुर्गा मंडळांची बैठक : मंडळांनी स्वयंसेवक नेमावे – गावीत

खान्देश टाईम्स न्यूज l जकी अहमद l  नवरात्र उत्सव हा मुळात महिलांचा उत्सव असतो. आपल्या माता भगिनींना त्यात मोठा सहभाग असतो, त्यांची सुरक्षा आपल्यासाठी महत्त्वाची असल्याने पोलिसांसोबत आपली देखील ती जबाबदारी आहे. महिला, भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी जळगाव शहरातील गणेश मंडळ आणि दांडिया रास आयोजकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. पोलीस मंगलम हॉलमध्ये आयोजित बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, परिरक्षावधीन उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, शिल्पा पाटील, डॉ.विशाल जयस्वाल, अनिल भवारी, महेश शर्मा आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी, आपल्या दांडिया रास कार्यक्रमात कुणाला प्रवेश आहे, स्पर्धकांना पास, ओळखपत्र दिले असल्यास पोलिसांना तसे कळविण्यास आम्ही बंदोबस्त देऊ. वाहतूक ठप्प होणार नाही यासाठी आम्ही उपाययोजना करणार आहोत मात्र कुणीही रस्ता अडवू नये, असे सांगितले. तसेच शासनाने रात्री १२ वाजेपर्यंत ४ दिवस वेळ ठरवून दिलेले आहे त्यामुळे त्याचे पालन करावे. आम्हाला इच्छा नसताना कारवाई करण्यास भाग पाडू नका. वेळेत कुणालाही सुट मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. कोणाच्याही भावना दुखावणारे नाही याची काळजी घ्या आणि आनंदाने नवरात्र उत्सव साजरा करा, असे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सांगितले की, आवाज तीव्रतेच्या मर्यादेबाबत ढोल ताशा पथकांचा मोठा गैरसमज आहे, पुढील वर्षी त्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. महिला, मुलींची छेडखानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, आपले स्वयंसेवक नेमावे. दुर्गा मंडळांना विसर्जनासाठी नवीन मार्गाला परवानगी मिळणार नाही. दुर्गा मंडळ आणि गरबा, दांडिया रास ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावे, जेणेकरून काही अनुचित प्रकार घडल्यास ते त्यात कैद होईल. दुर्गा माता दौडसाठी मार्ग ठरवून दिला आहे. मिरवणुकीत कोणीही डि.जे. लावल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे १० दिवस मंडळांनी पालन करावे. गणेशोत्सव शांततेत पार पडला ही अभिनंदनीय बाब आहे. विसर्जन मिरवणूक जसे शांततेत पार पडले तसेच श्रीदुर्गा विसर्जन शांततेत पार पडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button