जळगाव : – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचा पाठलाग करीत त्यांच्या सभांमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीटांसह सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या मालेगावच्या टोळीला जिल्हा पोलिसांनी गजाआड केले. या टोळीकडून १ लाख ८० हजारांची रोकड, कार व ८ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. तसेच राज्यभरात झालेल्या सभांमध्ये याच गँगेने चोरी केल्याचा संशय पोलिसांना – आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभरात सभा होत आहे. दरम्यान, तीन दिवसांपुर्वी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल, पाकीट, सोनपोत लांबविल्या. यामध्ये जळगाव पोलिसांनी यापुर्वी झालेल्या सभांमधील काही फुटेजचा आधार घेत चोरट्यांचा शोध सुरु केला. यामध्ये काही संशयित प्रत्येक सभेत असल्याचे समोर येताच पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कुहाकाकोडा येथे झालेल्या सभेतून या टोळीच्या मुसक्या आवळल्या. ही टोळी मालेगाव येथील असून या टोळीचा मोहरक्या अबू बक्कर उर्फ अबू कबूतर (वय ३५) याच्यासह त्याचया चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ताफ्यासोबत जात होते सभास्थळी मालेगाव येथील चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी चोरी केल्याची कबुली असून त्यांनी १ लाख ८० हजार रुपये रोख, एक चार चाकीवाहन, आठ मोबाईल काढून दिले. मनोज जरांगे पाटील ज्याठिकाणी सभा व्हायची त्याठिकाणी जाणाऱ्या त्यांच्या ताफ्याच्या मागे ही गँग सोबतच जात होती. विशेष म्हणजे या ताफ्यातील मंडळींसारखाच पेहराव ही गँग करून गर्दीचा फायदा घेत हातसफाई करीत असल्याचे उघड झाले आहे.
इतर ठिकाणांवरील सभांमधील गुन्हे उघडकीस येणार मनोज जरांगे पाटील यांच्या सभा ज्या-ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणावरील पोलिस ठाण्यांमध्ये या गँगविषयी माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यात ज्याठिकाणी सभा झाल्या, त्याठिकाणी काही चोऱ्या झाल्या असतील त्या उघड होण्यास यामुळे मदत होणार असल्याचा विश्वास पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला.