जळगाव : भावाच्या पत्नीसह स्वतःाच्या नावे असलेल्या प्लॉटचे खोटे पॉवर ऑफ अॅटर्नीचे बनावट दस्ताऐवज सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात तयार केले. त्याद्वारे १५०० स्क्वेअर मीटरचा प्लॉट परस्पर विक्री करीत महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोककुमार मोतीलाल बुच्चा व त्यांची पत्नी मंजूदेवी अशोककुमार बुच्चा या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामबाग कॉलनीत मंजूदेवी लिच्छीराम छाजेड या वास्तव्यास असून त्यांच्या वहिनी मंजूदेवी अशोककुमार बुच्चा यांनी मिळून मन्याखेडा शिवारात औद्योगीक वसाहतीच्या मालकीचा ३ हजार ६९० चौसर मिटर क्षेत्रफळ असलेला प्लॉट २०११ मध्ये ९५ वर्षाच्या करारवर घेतला आहे. त्यांनी याठिकाणी सामाईक पद्धतीने बांधकाम करुन महावीर इंन्टरस्ट्रीज नावाची फर्म स्थापन केली. परंतू त्यात कौटुंबिक वाद सुरु असल्याने ते एकमेकांच्या संपर्कात नाहीत. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या मालकीच्या कंपनीत अतुल विश्वनाथ मुळे हे औद्योगीक सामान ठेवण्यासाठी आले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी या जागेची रजिस्टरी केली असून ती जागा हस्तांतरीक करुन घेतली असल्याचे सांगितले. त्यानुसार मंजूदेवी छाजेड यांनी माहितीच्या अधिकारात कागदपत्रे प्राप्त करुन घेतले.
मंजूदेवी छाजेड यांचा भाऊ अशोककुमार बुच्चा व वहिनी मंजूदेवी अशोककुमार बुच्चा यांनी प्लॉट सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात खोटी पॉवर ऑफ अॅटर्नी तयार करुन त्यांच्या स्वतःच्या नावे करुन घेतले. तसेच त्याच्या आधारे त्यांनी जागेची विक्री सुहास विश्वनाथ मुळे व अमोल विश्वनाथ मुळे यांना खरेदी करुन दिली.
अशोककुमार बुच्चा व मंजूदेवी बुच्चा यांना कुठलेही अधिकार नसतांना त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन जागा खरेदी करुन देत फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मंजूदेवी छाजेड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे