जळगांव

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला, संपर्कातील व्यक्तींची तपासणी

खान्देश टाइम्स न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । देशात कोरोना व्हायरसचा जेएन १ हा नवीन व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे. शासनाने घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, नवीन व्हेरीयंट कोरीनाचा रुग्ण जळगाव जिल्ह्यात देखील आढळून आला आहे. भुसावळातील एका रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट देशात झपाट्याने पसरत असून याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी चाचण्यांना वेग आलेला आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून भुसावळ तालुक्यातील ४३ वर्षाचा रूग्ण हा कोरोनाने बाधीत आढळून आला असून याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. संबंधित रुग्ण काही दिवसापुर्वीच नेपाळहून जळगावात आला होता.

रूग्णाची प्रकृती उत्तम असून त्याचा एचआरसीटी रिपोर्ट २४ टक्के असल्याने चिंतेचे कारण नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत असला तरी तो आधी इतका धोकेदायक नसल्याची माहिती तज्ज्ञांनी आधीच दिलेली आहे. तथापि, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जळगावात सध्या सर्वाधिक कोविड चाचण्या झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button