इगतपुरी ;- कुरिअर कंपनीच्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून सशस्त्र टोळक्याने दरोडा टाकल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावाजवळ गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली . वाहनचालकासह त्याच्या साथीदाराच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकत तब्बल तीन कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. त्यात १०० ग्रॅम वजनाची ११ सोन्याची बिस्किटे, नऊ किलो वजनाच्या चांदीच्या विटांसह सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
बुधवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील काळबादेवी येथून कुरिअर कंपनीच्या शाखेतून मारुती इको कारने (एमएच- १२-यूजे-७९४८) चालक योगेंद्र शर्मा व साथीदार आकाश तोमर सोन्या-चांदीचा समावेश असणारे पार्सल घेऊन निघाले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कुरिअर वाहन मुंढेगाव-माणिकखांब शिवारात आले असता, त्यावर धाडसी दरोडा टाकण्यात आला. विशेष म्हणजे कोट्यवधींचा ऐवज
घेऊन जाणाऱ्या या कुरिअरच्या वाहनात कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर योगेंद्र शर्मा याने नाशिक येथील कुरिअरचे मालक प्रेम सिंग यांना घटनेची माहिती दिली.याप्रकरणी गोपालकुमार अशोककुमार (रा. धुरा, ता. किरावली, जि. आगरा, उत्तर प्रदेश, सध्या रा. जय बजरंग कुरिअर सर्व्हिस, काळबादेवी, मुंबई) यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिर्लेकर व पोलीस अधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे तपास करीत आहेत.