धुळे ;- राईनपाडा हत्याकांडाचा अखेर साडेपाच वर्षानंन्तर निकाल लागला. पाच भिक्षुकांच्या हत्याप्रकरणी धुळे न्यायालयाने ७ जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एत्त.ए.एम. ख्वाजा यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. ह्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
मुलं पकडणारी टोळी समजून भारत शंकर भोसले, भरत मावळे, दादाराव भोसले, आगनुक इंगोले, राजू भोसले या गोसावी डावरे समाजातील भिक्षुकांची हत्या केली होती. हे हत्याकांड १ जुलै २०१८ रोजी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात घडले होते. दरम्यान, या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. कौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेचा जलद निकाल लागण्याचे आश्वासन तेव्हा सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, निकालासाठी तब्बल ६ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेरीस सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली.
जन्मठेप सुनावलेल्या आरोपीमध्ये महारू ओंकार पवार, दशरथ दसन्या पिंपळसे, हिरालाल ढवळ्या गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज मणू बौरे, मोतीलाल काशिनाथ साबळे यांचा समावेश आहे. धुळे जिल्हा दंडाधिकारी क्र. १ चे न्यायमूर्ती एस.ए. एम. ख्वाजा यांच्या समोर खटल्याचे कामकाज चालले. यात विशेष सरकारी उज्वल निकम, जिल्हा सरकारी देवेंद्रसिंह तंवर, अ. सरकारी वकील निलेश कलाल यांनी विशेष भूमिका निभावली. तर तपासाधिकारी तत्कालीन डीवायएसपी श्रीकांत घुमरे यांची साक्ष महत्वाची ठरली आहे.