खान्देश टाइम्स न्यूज | २३ फेब्रुवारी २०२४ | जळगाव शहरात निवासी उपजिल्हाधिकारी आणि पथकावर हल्ला झाल्यानंतर वाळूमाफिया अधिकच सुसाट झाले आहे. त्यातच जळगावात अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू असून बिल्डर वाळूची हमी घेत असल्याने त्यांची देखील चांदी होत आहे. रिंगरोडवर असलेल्या एका निर्मानाधिन इमारतीच्या बाहेर मालवाहू गाडीने वाळू टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या कॅमेऱ्याने टिपला आहे.
जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतूक कागदोपत्री बंद असली तरी प्रत्यक्षात अनेक इमारतींचे बांधकाम बिनधास्तपणे सुरू आहे. बिल्डर स्वतः वाळू उपलब्ध करून देण्याची हमी घेत असल्याने इमारत मालक देखील निर्धास्त असतात. बिल्डरांच्या ऑर्डरमुळे वाळूमाफियांची चांदी होत असून त्यांना महसुली अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत आहे. महसुलच्या आशीर्वाद शिवाय वाळूचा एकही कण चोरणे शक्य नसताना बिनधास्त इमारतींचे बांधकाम होतेच कसे याचे मोठे आश्चर्य आहे. जळगाव शहरात काही दिवसापूर्वीच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांनी हल्ला केला होता. दोन दिवस अवैध वाळू वाहतूक बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाली आहे.
जळगावात सध्या ट्रक, ट्रालाने वाळू वाहतूक होत असताना आता आणखी एक नवा प्रकार समोर आला आहे. शहरात चक्क एका लहान मालवाहू वाहनाने वाळू वाहतूक होत असल्याचा प्रकार खान्देश टाइम्स न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रिंगरोडवर असलेल्या मणियार ग्राउंडसमोर एका इमारतीचे बांधकाम सुरू असून शुक्रवारी दुपारी ११.४५ वाजेच्या सुमारास मालवाहू वाहनातून किमान २ ब्रास वाळू टाकण्यात आली. इमारतीच्या स्लॅबचे आणि इतर बांधकाम सुरू असून तिथे बांधकामासाठी वाळू येतेच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. जळगाव शहर तहसीलदार, महसूल अधिकारी या प्रकाराकडे लक्ष वेधून काही कारवाई करणार की असेच बिल्डर आणि वाळूमाफियांना अभय देणार याकडे लक्ष लागून आहे.
पहा व्हिडिओ :