युरोपात पॅरोट फिव्हरने ५ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली ;- सध्या युरोप मधील अनेक देशांमध्ये पॅरोट फिव्हर () नावाच्या नवीन रोगाने कहर केलाय. या तापामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) आपल्या अहवालात मृत लोकांमध्ये 4 डेन्मार्कचे तर एक व्यक्ती नेदरलँडचा असल्याचे म्हटले आहे.
या पाच जणांव्यतिरिक्त ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वीडनमधील डझनभर लोकांना पोपट तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हा आजार अन्य देशांमध्येही फैलावू शकतो असेही या अहवालात म्हटले आहे.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, पक्ष्यांमध्ये आढळणारा एक जीवाणू पॅरोट फिव्हरच्या वेगाने पसरण्यामागे आहे. या जीवाणूचा संसर्ग झालेल्या पक्ष्याच्या चाव्याव्दारे किंवा अशा पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये हा संसर्ग पसरतो.
पॅरोट फिव्हरला सिटाकोसिस असेही म्हणतात. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, युरोपातील अनेक देशांतील लोक पॅरोट फिव्हरने त्रस्त झाले आहेत. 2023 च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये युरोपमधील अनेक लोकांना पॅरोट फिव्हरची लागण झाली होती. पण यंदा WHO च्या अहवालानुसार, तापाची साथ पसरल्यानंतर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.