इंद्रप्रस्थ नगरात विविध क्रीडा स्पर्धांचा समारोप
जळगाव, ;- नेहरू युवा केंद्र जळगाव व आई कोचिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच इंद्रप्रस्थ नगर व दूध फेडरेशन परिसरात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १० ते २० वर्ष वयोगटासाठी आयोजित स्पर्धांचा समारोप झाला असून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
केंद्र सरकारच्या युवा, क्रीडा मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे नेहमी युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. नुकतेच नेहरू युवा केंद्र जळगाव व आयोग कोचिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने इंद्रप्रस्थ नगर व दूध फेडरेशन परिसरात क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत १०० मीटर धावणे व गोळा फेक या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता.
१० ते २० वर्ष वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी आयोजित स्पर्धा पुरुष व महिला या दोन गटात पार पडल्या. स्पर्धेत एकूण ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले. स्पर्धेतील विजेत्यांना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, आई कोचिंग फाउंडेशनचे संस्थापक गणेश ठाकूर, सचिन सोनवणे, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक रोहन अवचारे यांच्या हस्ते पदक व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
स्पर्धासाठी पंच म्हणून पंकज पवार, सिद्धार्थ सोनवणे, गौरव साळवे, योगेश झणके, प्रदीप सोनवणे, राहुल सोनवणे यांनी काम पाहिले.