जीवघेण्या मारहाणीतून वैद्यकीय पथकाने काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर
जामनेर तालुक्यातील तरुणाला "जीएमसी" मध्ये दिलासा
जळगाव l जामनेर l १० जून २०२३ बेदम मारहाणीमुळे अर्धमेल्या अवस्थेत उपचारासाठी आलेल्या जामनेर तालुक्यातील तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले होते. वैद्यकीय पथकाचे कौतुक केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते तरुणाला रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
जामनेर तालुक्यातील नेरी येथील राहुल विश्वास निगडे (वय २९) याला बेदम मारहाणीमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील वैद्यकीय पथकाने त्याची स्थिती पाहून त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्याला जड व टणक वस्तूने मारहाण झाल्यामुळे दोन्ही हातांच्या कोपऱ्यापासून खाली, दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर झालेले होते. तसेच उजवा सांधा निखळला होता. रक्तस्राव प्रचंड झालेला असल्याने आधी रक्ताच्या ५ थैल्या चढवण्यात आल्या. त्यानंतर ५ दिवसांनी त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला जनरल कक्षात दाखल करण्यात आले.
तेथे रुग्णाच्या दोन्ही हातांचे आणि उजव्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. औषधोपचार करून २५ दिवसांनंतर त्याला नुकताच रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक शेजवळ यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. उपचार करण्याकामी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. जोतीकुमार बागुल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. शंतनू भारद्वाज, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. अंकित गावरी, डॉ. गोपाळ डव्हळे, डॉ. प्रणव समरुतवार, डॉ. सचिन वाहेकर यांच्यासह इन्चार्ज परिचारिका रत्नप्रभा पालीवाल, नीला जोशी यांनी परिश्रम घेतले. तसेच, पॅथॉलॉजी विभागाचे सहकार्य लाभले.