उबाठा गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांना साकडे
खान्देश टाइम्स न्यूज l २२ ऑक्टोबर २०२४ l जळगाव l जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून कुणाला रिंगणात उतरावयाचे यावर एकमत झालेले नाही. उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून मुंबई वाऱ्या सुरु झाल्या आहे. दरम्यान ठाकरे गटाचे इच्छुकांनी तिकिटासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची ही भेट घेतल्याने गोंधळात भर पडली आहे.
काही महिन्यांपूर्वी शरद पवार जेव्हा जळगाव शहरात आले होते त्यावेळी ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी आपल्या घरी बोलावून स्वतःचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट मिळण्यासाठी शरद पवार यांच्याकडून हिरवा कंदील मिळेल याकरिता ठाकरे गटातील काही नेते प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रयत्नात एका गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसू लागला आहे.