जळगाव तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळील घटना
जळगाव प्रतिनिधी;- भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या डंपर वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील घर्डी येथील दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळ घडली. दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरू आहे.
पंकज शंकर कोळी (वय 26) आणि कृष्णा उर्फ अमोल आनंदा कोळी (वय 27 दोन्ही रा. घार्डी ता. जळगाव) अशी मयत तरुणांची नावे आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पंकज कोळी आणि अमोल कोळी हे दोन्ही जळगाव तालुक्यातील घार्डी येथील रहिवासी असून ते सेंट्रींग काम करून आपला उदरनिर्वाह करतात. आज 19 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते दुचाकी क्रमांक (एम एच 19 – एबी 34 46) ने घरी गावाकडे जात असताना डंपर (क्रमांक एमएच 19- झेड 8067) समोरून जोरदार धडक दिल्याने पंकज आणि अमोल हे दोघे ठार झाले. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी मदत कार्य केले. पंकज कोळी यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार असून अमोल कोळी यांच्या पश्चात पत्नी दीड वर्षाची मुलगी व आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. याबाबत उशिरापर्यंत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.