
बंद रेल्वे गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक इंजिनवर आदळला, सुदैवाने जीवितहानी नाही
बोदवड: शुक्रवारी पहाटे ५ वाजता बोदवड रेल्वेस्थानकाजवळ एक धक्कादायक अपघात घडला. धान्याने भरलेल्या ट्रकचा चालक नियंत्रण गमावल्याने ट्रकने रेल्वे गेट तोडले आणि थेट वेगाने येणाऱ्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसच्या (गाडी क्र. १२१११) इंजिनवर जोरदार धडक दिली. प्रसंगावधान राखत रेल्वेचालकाने तातडीने ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातामुळे अनेक प्रवासी घाबरले, काहीजण सीटवरून खाली पडले, तर रेल्वेच्या हाय टेन्शन वायरचे मोठे नुकसान झाले.
कसा घडला अपघात?
बोदवड रेल्वे फाटक बंद असतानाही भरधाव ट्रक अडथळे तोडत रेल्वे रुळावर घुसला आणि समोरून धावणाऱ्या एक्सप्रेसच्या इंजिनवर धडकला. जोरदार धडकेनंतर ट्रकचालक वाहन सोडून फरार झाला. रेल्वे इंजिन आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले असले, तरी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम
या अपघातामुळे रेल्वे मार्गावरील हाय टेन्शन वायर तुटल्याने काही वेळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस, भुसावळ-बडनेरा मेमू, शालिमार एक्सप्रेस, चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस आणि वर्धा-भुसावळ एक्सप्रेस या गाड्या विलंबाने धावत आहेत.
रेल्वे प्रशासनाची त्वरित कार्यवाही
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने त्वरित बचावकार्य सुरू केले. तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, रेल्वे मार्गावरील अडथळे दूर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.