गुन्हेजळगांव

खडके बालगृह प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती

जळगाव l ३१ जुलै २०२३ l एरंडोल तालुक्यातील खडके येथील कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच या बालगृहातील बाल लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला ३ ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खडके येथील बालगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी बालगृहाचे काळजीवाहक गणेश पंडीत, अधीक्षिका अरुणा पंडीत आणि संस्थेचे सचिव भिवाजी दिपचंद पाटील यांचे विरुध्द २६ जुलै २०२३ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सादर केलेला अहवालानुसार संस्थेमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे ‌. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारीत अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील नियम आणि तरतूदींचे उल्लंघन करणारी आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रेमा घाडगे (बाल विकास प्रकल्प अधिकारी,खार सांताक्रुझ नागरी प्रकल्प, मुंबई उपनगर) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती (Special Investigation Team) गठित करण्यात आली आहे . या समितीने तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महिला व बाल विकास उपायुक्त राहूल मोरे यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button