खान्देश टाइम्स न्यूज | ५ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.१५ जुलै रोजी जबरी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी एका फरार आरोपीला गेंदालाल मील परिसरातून अटक केली आहे.
जळगाव शहरातील जोशी कॉलनीत राहणारे रिक्षा चालक निलेश उर्फ रायबा शांताराम जोशी यांना दि.१५ जुलै रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास चौघांनी बेंडाळे चौकाजवळ गल्लीत लुटले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी उपनिरीक्षक प्रिया दातीर यांच्या पथकाने गुन्ह्यातील तिघांना अटक केली होती तर एक संशयित अद्याप फरार होता.
शहर पोलिसांना एक आरोपी रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये दारू पीत बसला असल्याची शनिवारी दुपारी माहिती मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, योगेश बोरसे, रतन गिते, तेजस मराठे, अमोल ठाकूर यांच्या पथकाने समीर खान माजीद खान वय-३२ रा. गेंदालाल मील याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांना पाहून संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी बाहेर त्याच्या मुसक्या आवळल्या. पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.