
बॅटरीच्या कंपनीतून ३२५ किलो शिसे प्लेट चोरणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद
एमआयडीसी पोलिसांची अवघ्या काही तासात कारवाई
जळगाव – शहरातील एमआयडीसी ई-सेक्टरमधील ‘आनंद बॅटरी’ कंपनीत झालेल्या घरफोडीचा तपास एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरी केलेल्या ९७ हजार रुपये किमतीच्या शिशाच्या प्लेट्ससह गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
३१ जुलैच्या रात्री ८:३० ते १ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली होती. चोरट्यांनी कंपनीतून बॅटरी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ३२५ किलो वजनाच्या शिशाच्या प्लेट्स लंपास केल्या होत्या. या प्लेट्सची किंमत ९७ हजार रुपये होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकुर, गणेश ठाकरे, राहुल घेटे, किरण पाटील, नरेंद्र मोरे यांचा समावेश होता.
पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. यात जळगावमधील अट्टल गुन्हेगार मोहसिन उर्फ शेमड्या सिकंदर शहा आणि त्याच्या साथीदारांचा समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ मोहसिनला तांबापुरा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, त्याने त्याचे साथीदार इम्रान सैय्यद हरुण (रा. नशिराबाद), रहीम उर्फ बाबल्या रशिद खान आणि मेहमुद उर्फ चिनी शेख मोहंमद यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले.
पोलीस पथकाने इम्रान हरुण सैय्यदला नशिराबाद परिसरातून अटक केली. त्यानेही चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरलेल्या ९७ हजार रुपये किमतीच्या ३२७ किलो वजनाच्या १५ शिशाच्या प्लेट्स आणि २ लाख रुपये किमतीची रिक्षा जप्त केली आहे. मोहसिन आणि इम्रान या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी करत आहेत.





