जळगांवशासकीय

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव l ७ ऑगस्ट २०२३ l सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

यापूर्वी अर्जदार/ संस्था ज्यांनी सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे. त्या वर्षाकरीताचा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. या कालावधीकरीता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहीत केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांसह करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

या विविध पुरस्कारांची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री‌.पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button