छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पाऊल – पालकमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पाऊल – पालकमंत्री
जळगाव प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पावले असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हा या उपक्रमामागील खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पाळधी (ता. धरणगाव) येथील शासकीय विश्रामगृहात महसूल विभागाच्या वतीने आयोजित शिबिरात विविध शासकीय योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरजू नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
*शिबिरातील महत्त्वाचे उपक्रम व लाभ :*
शिबिरात एकूण ८८५ शासकीय दाखले (जात, उत्पन्न, शैक्षणिक, नॉन क्रिमीलेयर) वितरित करण्यात आले. ‘सुलभ शेतकरी योजना’ अंतर्गत तालुक्यातील १३५९ व पाळधी मंडळातील २५२ गटांमध्ये ‘तुकडा’ शेरा कमी करून सुधारित सातबारा उतारे शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले. ‘जिवंत सातबारा मोहिमे’ अंतर्गत ४३७ मयत खातेदारांच्या वारसांची नोंद घेऊन फेरफार दाखले तयार करण्यात आले.
‘संजय गांधी निराधार योजना’ अंतर्गत १६,१७६ लाभार्थ्यांपैकी १४,००० जणांना थेट बँक खात्यात लाभ जमा करण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांचे कामकाज शिबिरात सुरू आहे. महिला शेतकरी मुक्ताबाई अर्जुन सूर्यवंशी यांना यांत्रिक सहाय्य म्हणून १.२५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. घरकुल योजनेंतर्गत तालुक्यातील ४,७३२ लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाच्या निर्णयानुसार प्रारंभी २० लाभार्थ्यांना वाळू वितरित करण्यात आली.
*प्रशासनाचा लोकांशी थेट संवाद :*
शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचले असून, नागरिकांच्या अडचणी तत्काळ मार्गी लावण्यात आल्या. प्रशासन व जनतेतील विश्वास दृढ करणारा हा उपक्रम ठरला.
उपस्थित मान्यवर :
या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच विजय पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, उपअभियंता एस. डी. पाटील, शेतकी संघाचे संजय महाजन, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, आबा माळी, कल्पेश कोळी, महेश शिंपी, समाधान माळी, अनिल माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी केले, तर आभार प्रभारी तहसीलदार संदीप मोरे यांनी मानले.
—