संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा पर्यावरणपूरक निर्णय : शैक्षणिक फीऐवजी देशी बियाणे स्वीकारणार

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा पर्यावरणपूरक निर्णय : शैक्षणिक फीऐवजी देशी बियाणे स्वीकारणार
जळगाव प्रतिनिधी l – पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाने एक वेगळा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शाळेचे संस्थाचालक व माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या संकल्पनेतून “शैक्षणिक फी न घेता देशी बियाणे” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशी बियाणे शाळेच्या इको क्लबद्वारे चालवल्या जाणाऱ्या सीड बँकेत जमा केल्यास त्यांना शैक्षणिक फीमध्ये सवलत दिली जाणार आहे.
या उपक्रमामागचा हेतू केवळ देशी बियाण्यांचे जतन आणि संवर्धन करणे आहे, कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा मिळवणे हा उद्देश नाही, असे संस्थाचालक प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. “विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. हेही विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणासाठी दिले जाणारे प्रोत्साहनच आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी अध्यक्ष प्रशांत नाईक यांचे आभार मानत विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल कौतुक केले. तसेच इको क्लबमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्याचीही प्रशंसा करण्यात आली.





