
तरुणाचा खून; २४ तासांत एलसीबीची कारवाई, चार संशयित अटकेत
फरार आरोपीचा शोध सुरू
जळगाव (प्रतिनिधी) अशोक नगर भागातील आकाश पंडित भावसार (वय २७) या तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावरील ए वन भरीत सेंटरजवळ शनिवारी रात्री धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केवळ २४ तासांत चार संशयितांना अटक करत तपासात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.
या प्रकरणी आकाश भावसार यांच्या आई कोकिळाबाई भावसार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अजय मंगेश मोरे (वय २८, रा. कासमवाडी, जळगाव) याच्यासह चार अनोळखी इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबी आणि शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत काही आरोपींना मित्र व नातेवाइकांकडे लपून बसलेले असताना शोधून काढले.
पोलिसांनी अजय मोरे याच्यासह तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील कुणाल उर्फ सोनू चौधरी हा मुख्य संशयित अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारीवर कडक कारवाई व्हावी आणि अशा घटनांना आळा बसावा, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.