खान्देशजळगांवसामाजिक

जळगाव जिल्हा बँकेत २२० लिपिक पदांची भरती लवकरच

एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे; कर्जमाफीसाठी ठराव मंजूर

जळगाव जिल्हा बँकेत २२० लिपिक पदांची भरती लवकरच

एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे; कर्जमाफीसाठी ठराव मंजूर

जळगाव (प्रतिनिधी): जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच २२० लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भरतीसाठी योग्य एजन्सीची निवड करण्यासाठी प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून, मंजुरी मिळताच भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीस उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर जयश्री महाजन, किशोर पाटील, नाना राजमल पाटील, घनश्याम अग्रवाल, शैलजा निकम, प्रदीप देशमुख यांच्यासह संचालक मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.

बैठकीनंतर माहिती देताना अध्यक्ष संजय पवार म्हणाले, “भरतीसाठी चार एजन्सींचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी एका एजन्सीची निवड सहकार आयुक्तांच्या मान्यतेनंतर अंतिम करण्यात येईल. या भरती प्रक्रियेमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”

बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेतील विलंबाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शासनाने या मुद्द्याकडे तातडीने लक्ष द्यावे व कर्जमाफी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी एकमताने मंजूर करण्यात आलेल्या ठरावात व्यक्त करण्यात आली.

सध्या तीन लाखांपर्यंतच्या शेती कर्जावर शून्य टक्के व्याज आकारले जाते. ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी शिफारस करत आणखी एक ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. यासंदर्भात संचालक मंडळातील आमदार शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील मोठ्या संस्था, कारखाने तसेच साखर कारखान्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे जिल्ह्याचा आर्थिक विकास साधला जाईल तसेच सहकार क्षेत्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button