सून्नी ईदगाहवर नमाजे ईद-उल-अझहा उत्साहात ; हजारोंची उपस्थिती
विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

सून्नी ईदगाहवर नमाजे ईद-उल-अझहा उत्साहात ; हजारोंची उपस्थिती
विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील नियाज अली नगर, सुप्रीम कॉलनी परिसरातील सून्नी ईदगाह मैदानावर आज शनिवार, दि. ७ जून २०२५ रोजी ईद-उल-अझहा (बकरी ईद) निमित्त विशेष नमाज सकाळी ८.३० वाजता मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तीभावात अदा करण्यात आली.
ही विशेष नमाज मौलाना जाबीर रझा यांच्या नेतृत्वाखाली अदा करण्यात आली. नमाजेसाठी सुमारे आठ हजार नमाजी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सून्नी ईदगाह ट्रस्ट आणि सून्नी जामा मस्जिद जळगावचे अध्यक्ष सैयद अयाज अली नियाज अली यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व शांतता, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पालनाचे आवाहन केले.
त्यांनी जळगाव जिल्हा पोलीस दल, एमआयडीसी पोलीस स्टेशन, आणि जळगाव महानगरपालिकेचे ईद नमाज व कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
नमाजापूर्वी मौलाना नजमूल हक यांनी नमाज पठणाची पद्धत (तरिका-ए-नमाज) समजावून सांगितली, तर मौलाना अलीम रझा यांनी ईदचे महत्त्व विशद करणारे प्रेरणादायी प्रवचन दिले.
प्रार्थनेच्या वेळी “ए अल्लाह, हमारी और हमारे मुल्क भारत की हिफाजत फरमा, बेरोजगारों को रोजगार अता फरमा, बिमारों को शिफा अता कर” अशी दुआ करण्यात आली. उपस्थितांनी “आमीन” म्हणत त्या प्रार्थनेला पाठिंबा दिला.कार्यक्रमाची सांगता सलातो-सलाम पठणाने करण्यात आली.
या प्रसंगी सैयद अयाज अली नियाज अली, मौलाना खलील बरकाती, मौलाना नजमूल हक, मौलाना अलीम रझा, इकबाल वझीर, अफझल मनियार, मुख्तार शाह, साबीर मुत्सुफाबादी, उमर खान, रहेमत अली, जमील शेख आदी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला.