पावसाने घेतली विश्रांती; तापमानवाढीने जळगावकरांना उकाड्याचा तडाखा

पावसाने घेतली विश्रांती; तापमानवाढीने जळगावकरांना उकाड्याचा तडाखा
जळगाव | प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. हवामानात गारवा निर्माण झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून याचा परिणाम तापमानावर दिसू लागला आहे. जळगावमध्ये पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढू लागला असून आगामी आठवडाभर तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या वातावरणात दमटपणा वाढला असून उष्णतेची तीव्रता देखील जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारपासून पुन्हा कमाल तापमान ३० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या ढगाळ वातावरण असले तरी पावसाची खास शक्यता नाही.
रविवारी सायंकाळच्या सुमारास हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, सोमवार व मंगळवारी तापमानात किंचित घट होऊन पारा एका अंशाने खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याचदरम्यान किमान तापमान २३ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
तथापि, मंगळवारनंतर जळगावमध्ये तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. १५ जुलैपासून कमाल तापमान ३० अंशांवर पोहोचेल, तर १६ ते १८ जुलैदरम्यान ते ३१ अंशांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. याच काळात किमान तापमानही २४ अंशांवर राहण्याची शक्यता आहे.
या कालावधीत पावसाची शक्यता अत्यंत कमी असून वातावरणातील आर्द्रता अधिक वाढेल. त्यामुळे जळगावकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवामानातील ही बदलती स्थिती आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरू शकते.





