चोपडा ग्रामीण पोलिसांची तस्करीविरोधी अनोखी शक्कल ; गांजा गावठी कट्टा विकणारेच आमचे खबरीचे जागोजागी लावले फलक !

चोपडा ग्रामीण पोलिसांची तस्करीविरोधी अनोखी शक्कल ; गांजा गावठी कट्टा विकणारेच आमचे खबरीचे जागोजागी लावले फलक !
जळगाव : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील उमर्टी, गलांगी, सत्रासेन आणि वैजापूर भागात होणाऱ्या अवैध शस्त्र व गांजाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांनी नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पुढाकाराने गावांत जागोजागी फलक लावण्यात आले असून, त्यावर “गांजा, गावठी पिस्टल, कट्टा विकणारेच आमचे खबरी आहेत. खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे,” असा थेट इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश तस्करांमध्ये मनोवैज्ञानिक दबाव निर्माण करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे हा आहे. संशयित व्यक्ती किंवा वाहनांची माहिती देण्यासाठी पोलिसांनी विशेष फोन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
गावांत गस्त वाढवणे, संशयित वाहनांची तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई यासारख्या उपाययोजना सुरू असून, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास परिसरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.