
जळगाव : -शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या भांडणातून झालेल्या वादातून एकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (राजपूत, 25, गजानन पार्क, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आकाश प्रेम तंवर (वय २४, रा. गजानन पार्क, कुसुंबा ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तो गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता कंपनीत कामावर जात होता. एमआयडीसी सेक्टर नंबर व्ही येथील प्रभा पॉलिमर कंपनी जवळ जात असताना आकाश तंवर त्याचा मित्र रोहित पवार तसेच अनिल सैंदाणे, समाधान पाटील, भरत चांदवडे, धीरज पवार हे गप्पा करीत उभे असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (रा. गजानन पार्क, कुसुंबा) हा त्याचे मित्र विपुल पाटील व अजय पाटील (दोन्ही रा. कुसुंबा) यांच्यासोबत आला. स्वप्नील आकाश तंवर याला म्हणाला की, बब्या कुठे आहे, त्याने तुझ्या सांगण्यावरून मला मारले आहे. आज तुमच्या दोघांचा गेम करतो. त्यावर आकाश तंवर याने, बाब्याबाबत मला काही माहिती नाही, असे सांगितले.
मात्र त्याचे वाईट वाटून स्वप्नील मोरे याने कमरेला लावलेला बंदूक कट्टा काढून आकाश तंवर याच्यावर रोखला. आधी तुझे व नंतर बब्याचे काम करतो असे स्वप्निल मोरे म्हणाला. त्यावेळी त्यानी गोळी झाडली. पण आकाशने खाली वाकून गोळीचा नेम चुकवला आणि रस्त्यात पडलेला दगड उचलून संशयित स्वप्नील मोरे यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर स्वप्निल मोरे याने पुन्हा दुसरी गोळी आकाश तंवर याच्यावर फायर केली. ही गोळी आकाशच्या अंगाच्या जवळून गेली. नंतर पुन्हा तिसरी गोळी झाडत असताना त्याचे पिस्तूल अडकले. त्यामुळे घाबरून आकाश याने पुन्हा दुसरा दगड उचलून त्याच्यावर फेकत असताना स्वप्नील मोरे आकाश याच्या जवळ गेला. डोक्यावर पिस्तुलाने मारले. नंतर आकाशच्या हातात दगड सापडल्याने तो पळून गेला.
ही घटना आकाश तंवरच्या मित्रांनी पाहिली. संशयित स्वप्नील मोरे यांच्यासोबत आलेले विपुल पाटील, अजय पाटील हे लगेच मोटरसायकल घेऊन त्याच्यामागे गेले आणि त्याला दुचाकीवर बसवून प्रभा पॉलिमर येथून निघून गेले. त्यानंतर आकाश तंवर याने त्याचा काका राजेश पवार यांना घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी त्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. संशयित आरोपींच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत.
सोपानने तीन दिवसांपुर्वीच 16 हजार रूपयात गावठी कट्टा आणि तीन काडतूस खरेदी केल्याची माहिती समोर येत असून अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक निरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, इम्रान सैय्यद यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली.