
पूर्ववैमनस्यातून गोळीबार हल्ला; दोन आरोपी अटकेत, मुख्य आरोपी फरार
जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी (२४ एप्रिल) रात्री ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा करत असताना गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. यामध्ये महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महेंद्र सपकाळे आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी मित्रांसह शाळेजवळ उपस्थित होता. दरम्यान, विशाल भिकन कोळी, बापू वंशीलाल धोबी, वैभव धीरज कोळी आणि भोला भोई हे चार ते पाच साथीदारांसह तिथे आले. यावेळी त्यांनी पूर्वीच्या वादातून महेंद्रला उद्देशून शिवीगाळ करत थेट गोळी झाडली. विशाल कोळीने कमरेत लपवलेली बंदूक काढून महेंद्रच्या उजव्या बाजूच्या कमरेवर गोळी झाडली आणि त्यानंतर इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी महेंद्र सपकाळे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना अटक केली असून, मुख्य आरोपी विशाल कोळी आणि त्याचा एक साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक राबवले जात आहे.
या गोळीबाराच्या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, फरार आरोपींच्या शोधासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करत आहेत