
सावधान! मोबाईलवर आलेली ‘ती’ फाईल डाउनलोड केली अन् रिक्षाचालकाला बसला २.९८ लाखांचा फटका
वरणगाव पोलिसांत सायबर क्राईमचा गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी): वाहनचालकांनो सावधान! तुमच्या मोबाईलवर जर आरटीओ (RTO) ई-चलन भरण्याबाबत किंवा त्यासंबंधीची एखादी फाईल आली, तर ती चुकूनही ओपन करू नका. भुसावळ जवळील वरणगाव येथे ई-चलनाच्या नावाखाली पाठविण्यात आलेली बनावट ‘APK’ फाईल डाउनलोड करणे एका रिक्षाचालकाला भलतेच महागात पडले आहे. ही फाईल डाऊनलोड करताच अज्ञात सायबर भामट्यांनी रिक्षाचालकाचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ९८ हजार ३९ रुपये परस्पर लांबवले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अशी झाली फसवणूक:
वरणगाव येथील रामपेठ परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय रिक्षाचालकाच्या मोबाईलवर अज्ञात सायबर चोरांनी व्हॉट्सॲपवर ‘RTO E-CHALLAN.apk’ नावाची एक फाईल पाठवली होती. आपले काही चलन तर बाकी नाही ना, या विचाराने रिक्षाचालकाने ती फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड केली. फाईल डाउनलोड होताच सायबर चोरांनी त्यांचा संपूर्ण मोबाईल आपल्या ताब्यात (हॅक) घेतला. त्यानंतर त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खात्यातून ओटीपी (OTP) मिळवून तब्बल २ लाख ९८ हजार ३९ रुपये परस्पर काढून घेतले.
खात्यातून पैसे वळते झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित रिक्षाचालकाने तातडीने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० मधील कलम ६६(डी) आणि ४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





