
आयटीआय जवळील कचरा केंद्र हटवा; मनसेचा मनपाला इशारा
जळगाव: शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ (ITI) असलेल्या कचरा संकलन केंद्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला आहे. या केंद्रांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. हे केंद्र तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
मनसेने महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटीआय जवळील कचरा केंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे विद्यार्थी आणि नागरिकांना त्रास होत आहे. माशा, डास आणि उंदरांचा उपद्रव वाढल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या केंद्राजवळ शासकीय तंत्रनिकेतनसारखी शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही नकारात्मक परिणाम होत आहे. दुर्गंधीमुळे त्यांचे लक्ष विचलित होत असून, शिक्षणाचे मूलभूत हक्क धोक्यात आल्याचे मनसेने म्हटले आहे.
कायद्याचे उल्लंघन आणि स्वच्छ भारताला आव्हान
मनसेने आपल्या निवेदनात हे कचरा केंद्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम १९४९ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे उल्लंघन करत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, हे केंद्र ‘स्वच्छ भारत अभियान’च्या उद्दिष्टांच्या विरोधात असून, शहराच्या सौंदर्यालाही बाधा आणत असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.
यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही महानगरपालिकेने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप मनसेने केला आहे. १ सप्टेंबरपासून शहर स्वच्छतेची जबाबदारी नव्या एजन्सीकडे येणार असून, त्यांनाही हे कचरा केंद्र कायमस्वरूपी बंद ठेवण्याची सूचना देण्याची मागणी मनसेने केली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर कायदेशीर लढाई आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





