जळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; नागेश्वर कॉलनीतील धक्कादायक घटना

जळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; नागेश्वर कॉलनीतील धक्कादायक घटना
जळगाव (प्रतिनिधी) –नागेश्वर कॉलनी परिसरात १ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संतप्त नातेवाइकांनी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
नागेश्वर कॉलनीत राहणारे सचिन गायकवाड यांचा ४ वर्षीय मुलगा अरविंद उर्फ बॉबी हा घरासमोरील अंगणात खेळत होता. यावेळी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने बालकाच्या मानेचे लचके तोडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि रक्तबंबाळ अवस्थेत पडला. शेजाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी तात्काळ कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका करून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर बॉबीला मृत घोषित केले.
बालकाच्या मृत्यूची बातमी कळताच गायकवाड कुटुंबीयांसह मित्र आणि नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली. बालकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी हृदयद्रावक आक्रोश केला. संतप्त नातेवाइकांनी मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या घटनेने मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे