खान्देशजळगांवसामाजिक

२४ वर्षांचे विक्रम धुळीस! जळगावकरांना उन्हाचा तडाखा; आता पावसाची चाहूल, हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

२४ वर्षांचे विक्रम धुळीस! जळगावकरांना उन्हाचा तडाखा; आता पावसाची चाहूल, हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

सलग ४७ दिवस पारा ४० अंशांच्या वर; मे महिन्यात तापमानात तब्बल ६ अंशांची वाढ, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्याने अक्षरशः कहर केला असून गेल्या २४ वर्षांतील उष्णतेचे अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. यंदाच्या उन्हाळी हंगामात सलग ४७ दिवस तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवला गेला. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी, कामगार आणि व्यावसायिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात सरासरी तापमानात तब्बल ६ अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने उकाड्याची तीव्रता अधिकच वाढली होती.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार एप्रिल आणि मे महिन्यात सूर्याने अक्षरशः आग ओकली. गतवर्षी मे महिन्यात मोजक्याच दिवशी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते, मात्र यंदा जवळपास संपूर्ण महिनाभर पारा ४० अंशांच्या वरच राहिला. त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला तर ग्रामीण भागातही नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.

दरम्यान, भीषण उष्णतेनंतर आता जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने ३० मे ते १ जून या कालावधीसाठी जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात काही भागांत विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असून राज्यात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र वादळी वारे आणि विजांच्या संभाव्य धोक्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुढील पाच दिवसांचे संभाव्य हवामान

  • ३० मे : कमाल तापमान ४१ अंश, सायंकाळनंतर पावसाची शक्यता
  • ३१ मे : कमाल तापमान ४१ अंश, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, यलो अलर्ट
  • १ जून : कमाल तापमान ४० अंश, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, यलो अलर्ट
  • २ जून : कमाल तापमान ४० अंश, ढगाळ वातावरण, सायंकाळनंतर पावसाची शक्यता
  • ३ जून : कमाल तापमान ४० अंश, ढगाळ वातावरण, सायंकाळनंतर पावसाची शक्यता

उन्हाच्या तीव्र झळा सोसलेल्या जळगावकरांना आता मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा लागली असून, आगामी काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button