
वाहनांच्या मॅन्युअल फिटनेस तपासणीला २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ
एटीएस केंद्र कार्यान्वित होईपर्यंत जुन्याच पद्धतीने तपासणी सुरू राहणार; जळगाव, चाळीसगाव व भडगावमधील वाहनधारकांना दिलासा

प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार वाहनांची मॅन्युअल फिटनेस तपासणी करून प्रमाणपत्र देण्याची मुदत २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना फिटनेस तपासणीसाठी अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यापूर्वी जारी केलेल्या आदेशात ३१ ऑक्टोबर ही मॅन्युअल फिटनेस तपासणीची अंतिम तारीख निश्चित केली होती. त्यानंतर वाहनांची फिटनेस चाचणी केवळ ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) केंद्रांवरच होणार असल्याने वाहनधारकांसमोर अडचण निर्माण झाली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये एटीएस केंद्र सुरू आहेत, तेथे जाऊन वाहनांची तपासणी करून घेण्याची वेळ वाहनचालकांवर येणार होती. मात्र, आता मुदतवाढ मिळाल्याने ही गैरसोय टळली आहे.
जळगाव आरटीओ कार्यालयात दरमहा साधारण ८०० वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रांची नोंदणी होते. त्यामुळे या निर्णयाचा लाभ मोठ्या संख्येने वाहनधारकांना होणार आहे. जळगाव मुख्य प्रादेशिक परिवहन कार्यालयासह चाळीसगाव आणि भडगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनाही या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
जळगाव येथील स्वयंचलित चाचणी केंद्र (एटीएस) कार्यान्वित होईपर्यंत परिवहन प्रणालीवरील मॅन्युअल पद्धतीने फिटनेस तपासणीची सुविधा बंद करण्याची कारवाई तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्वीप्रमाणेच मॅन्युअल पद्धतीने वाहनांची फिटनेस तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.




