खान्देशगुन्हेजळगांव

सावकारीच्या विळख्यात आणखी एक बळी? कर्जाच्या तगाद्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सावकारीच्या विळख्यात आणखी एक बळी? कर्जाच्या तगाद्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार; रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात खाजगी सावकाराच्या कथित मानसिक छळाला आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवैध सावकारीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय रवींद्र पाटील (वय २५, रा. खेडी शिवार, जळगाव) हा एका बँकेच्या फायनान्स विभागात कार्यरत होता. काही आर्थिक अडचणींमुळे त्याने खाजगी व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित सावकाराकडून सातत्याने पैशांचा तगादा लावला जात होता. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

रविवारी (३१ मे) दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास अक्षयने आपल्या राहत्या घरातील मागील खोलीत गळफास घेतल्याचे त्याच्या वडिलांच्या व बहिणीच्या निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. संबंधित सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी रुग्णालयात भेट देत कुटुंबीयांची समजूत काढली आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा आणि सावकारीच्या आरोपांचा तपास सुरू केला आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध सावकारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button