
चाळीसगावात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांची धूम स्टाईलने सोनसाखळी चोरी
चाळीसगाव : शहरातील धुळे रोडवरील विराम गार्डनसमोर एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या मंगळसूत्रातील अर्धा भाग चोरट्यांनी दुचाकीवरून धूम स्टाईलने लंपास केल्याची घटना मंगळवारी (७ मे) दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास घडली.
शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील मंगला गोकुळ सोनजे (वय ७०) या चाळीसगाव येथील फेस्टीओ रेसिडेन्सीमध्ये नातेवाईकाच्या लग्नासाठी आल्या होत्या. लग्नानंतर त्या एसटी बसने परत जाण्यासाठी विराम हॉटेलजवळ रस्त्यावर उभ्या होत्या. याच वेळी धुळ्याकडे जाणारी बस दिसल्याने त्या रस्त्याकडेला गेल्या.
अचानक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवल्यामुळे चोरटे फक्त १५ ग्रॅम वजनाचे पेंडल आणि अर्धा भाग घेऊन पसार झाले.
या घटनेनंतर मंगला सोनजे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विजय शिंदे करत आहेत.