
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय; सामाजिक न्याय, ऊर्जा, आदिवासी विकास, नगरविकासावर भर
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांना २,५०० रुपये अर्थसहाय्य, मेट्रो प्रकल्पांना गती
:मुंबई: – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (३ सप्टेंबर २०२५) मनत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास आणि नगरविकास क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र, या बैठकीला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अनुपस्थिती दर्शवली, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय:१. सामाजिक न्याय विभाग: संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना: दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य १,५०० रुपये वरून २,५०० रुपये करण्याचा निर्णय. यामुळे लाखो लाभार्थ्यांना दरमहा १,००० रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल.
२. ऊर्जा विभाग: महानिर्मिती कंपनीच्या राखेचा वापर: औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित. यामुळे पर्यावरणपूरक राखेचा निपटारा आणि पुनर्वापराला प्रोत्साहन मिळेल.
३. कामगार विभाग: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा: नोकरी आणि सेवाशर्तीच्या नियमांमध्ये बदल करून कामगारांसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा निर्णय.
कारखाने अधिनियम, १९४८ मध्ये सुधारणा: कारखान्यांमधील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि आधुनिक अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार सुधारणा.
४. आदिवासी विकास विभाग: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती: अनुसूचित जमातीतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध होतील.
५. नगरविकास विभाग: मुंबई मेट्रो मार्गिका-११: वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो प्रकल्पाला मान्यता. यासाठी २३,४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद.
ठाणे, पुणे, नागपूर मेट्रो प्रकल्प: ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुणे मेट्रो मार्गिका-२, मार्गिका-४ (पिंपरी-चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, खडकवासला-स्वारगेट-खराडी, नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग), आणि नागपूर मेट्रो टप्पा-२ साठी बाह्यसहाय्यित कर्जांना मान्यता.
पुणे मेट्रो स्थानके: स्वारगेट ते कात्रज मार्गावर बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन नवीन मेट्रो स्थानकांना मंजुरी. कात्रज स्थानकाचे ४२१ मीटर दक्षिणेकडे स्थलांतर आणि ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP-3, 3A, 3B): उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या खरेदीसाठी कर्ज आणि ५०% राज्य शासनाचा आर्थिक सहभाग मंजूर.
पुणे-लोणावळा लोकल मार्गिका: तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांसाठी आर्थिक तरतूद.
ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग: सिडकोद्वारे सार्वजनिक-खासगी-भागीदारी (PPP) तत्त्वावर BOT पद्धतीने राबविण्यास मान्यता.
नवीन नागपूर: गोधणी आणि लाडगांव (हिंगणा, जि. नागपूर) येथे ६९२.०६ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र (IBFC) विकसित करण्यास तत्त्वत: मान्यता.





