
“I love Muhammad” लिहिल्याबद्दल एफआयआर: सावदा मुस्लिम समाजाचा निषेध
राष्ट्रपती-पंतप्रधानांकडे हस्तक्षेपाची मागणी
सावदा:शेख मुख्तार रावेर तालुक्यातील सावदा येथील घटनेच्या निषेधार्थ दि. 19 सप्टेंबर 2025 शुक्रवार रोजी सावदा पोलीस स्टेशन मध्ये समस्त सावदा मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे फक्त “आय लव्ह मुहम्मद” लिहिल्याच्या कारणावरून 25 निष्पाप मुस्लिम तरुणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याच्या घटनेने सावदा येथील मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे. समस्त सावदा मुस्लिम समाजाने या कारवाईला भारतीय संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला ठरवत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना याचिका पाठवून त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
सावदा मुस्लिम समाजाने निवेदनात म्हटले आहे की, “आय लव्ह मुहम्मद” लिहिणे हे प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. यात कोणत्याही धर्माचा अपमान होत नाही. अशा अभिव्यक्तीला गुन्हा ठरवणे हा लोकशाही आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला आहे. समाजाने भारतीय संविधानातील खालील कलमांचा आधार घेत आपली भूमिका मांडली:
कलम 19(1)(अ): अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी.
कलम 25: प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन आणि प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार.
कलम 21: जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी.
समाजाच्या मागण्या
१. 25 निष्पाप तरुणांविरुद्ध दाखल एफआयआर तात्काळ रद्द करावे.
२. भविष्यात कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना आणि अभिव्यक्तींवर अशी असंवैधानिक कारवाई होऊ नये.
३. देशातील प्रत्येक नागरिकाला संवैधानिक समानता आणि धार्मिक स्वातंत्र्याची हमी मिळावी.
सावदा मुस्लिम समाजाने अशी भावना व्यक्त केली आहे की,जर सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून निष्पाप तरुणांना न्याय दिला नाही, तर हे लोकशाही आणि संविधानाच्या प्रतिष्ठेवर कलंक ठरेल.”आम्ही न्याय, समानता आणि बंधुत्वासाठी कटिबद्ध आहोत.
शेखपुरा मुस्लिम पंच सचिव शेख मुख्तार शेख अरमान यांनी म्हटले आहे की, धार्मिक भावनांचा आदर करणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देणे हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाने मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना निवेदन सादर केले. यावेळी मोहम्मद उमेर खान, शेख अरबाज, अबु दानिश, दानिश खान, आबिद शेख नजीर, मकसूद खान मुस्तफा खान यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. तसेच, शेखपुरा मुस्लिम पंच सचिव शेख मुख्तार शेख अरमान, हाजी जाविद कारी, शेख राजा शेख सादीक, शेख निसार शेख नबी,मोठा आखाडा मुस्लिम पंच शेख इरफान शेख लुकमान, शेख आबिद शेख मजीद उर्फ 90, मोईन लाला,शेख चांद शेख शब्बीर शेख अजहर शेख कमील, माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्य यांच्यासह मुस्लिम समाजाने सहभाग दर्शवले.





