महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सावद्यात आरोग्य तपासणी आणि पत्रकारांची सभा उत्साहात

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सावद्यात आरोग्य तपासणी आणि पत्रकारांची सभा उत्साहात
सावदा, (अजहर खान) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रावेर तालुक्यातील सावदा येथे रविवार, 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता पत्रकारांसाठी मोफत बॉडी चेकअप शिबिर आणि सभेचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली. याशिवाय, पत्रकार संघटनेच्या हितासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मोफत बॉडी चेकअप शिबिर
जोगेश्वरी वेलनेस आणि फिटनेस सेंटर, खिरोदा यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात आरोग्य सल्लागार सौ. दिपाली उदय महाजन यांनी “हमारा एक ही सपना… निरोगी रहे भारत अपना” या संदेशासह पत्रकारांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. उषा पाटील, पुष्पा कोळंबे, अर्चना सैतवाल आणि रमेश पाटील यांनी सहभागी पत्रकारांची बॉडी ॲनालिसिस रिपोर्टद्वारे तपासणी केली. यावेळी त्यांनी स्नायूंचे प्रमाण कमी असल्यास उद्भवणारे अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, चक्कर येणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांबाबत माहिती दिली. तसेच, निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि आहाराचे महत्त्व समजावून सांगितले.
या शिबिरात मोफत झूम ॲपद्वारे दररोज सकाळी आणि संध्याकाळी ऑनलाइन व ऑफलाइन व्यायाम आणि आहार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचेही जाहीर करण्यात आले.
पत्रकार सभेत महत्त्वपूर्ण निर्णय
शिबिरानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सभा संपन्न झाली. यात पत्रकारांच्या हितासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी रणनीती आखण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष संतोष नवले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा सचिव राजेश चौधरी, सावदा शहराध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, उपाध्यक्ष अजहर खान, किशोर परदेशी, कैलास लवंगडे, शेख मुक्तार आणि गोपाल पाटील उपस्थित होते.
हा कार्यक्रम दुर्गा केबल नेटवर्क किशोर परदेशी यांचे केबल टीव्ही कार्यालय, श्रीराम नगर, शिवाजी चौक, स्वास्तिक उपहारगृहासमोर, सावदा येथे आयोजित करण्यात आला होता.





