अमानुष अत्याचार-हत्या प्रकरणी तातडीची कारवाई करावी – एकता संघटना

अमानुष अत्याचार-हत्या प्रकरणी तातडीची कारवाई करावी – एकता संघटना
जळगाव जिल्हा एकता संघटनेने यावल पोलिस ठाण्यासह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मानवी हक्क आयोगाकडे निवेदन सादर करून दोन गंभीर घटनांबाबत तातडीने व निष्पक्ष कारवाईची मागणी केली आहे.
यावल तालुक्यातील दहीगाव येथे घडलेल्या इमरान पटेल हत्याकांडाला सुरुवातीला किरकोळ वादाचे रूप देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात हा मुस्लिम समाजातील युवकावर लक्षित हल्ला असल्याचा संशय असल्याने या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या तहेसिन पूनावाला विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या निर्णयानुसार करण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे.
दरम्यान, पाच वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला असून, आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींचा सहभाग स्पष्ट असूनही पोलिसांकडून अपेक्षित ती कारवाई झाली नसल्याचे संघटनेने निदर्शनास आणले.
एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी इशारा दिला की, जर दोन्ही प्रकरणांत तातडीची आणि कठोर कारवाई झाली नाही, तर संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.
संघटना व फिर्यादींच्या प्रमुख मागण्या अशा :
दोन्ही प्रकरणांची निष्पक्ष व जलद चौकशी करावी.
पीडित कुटुंबांना BNS कलम 396 अंतर्गत तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
खटले फास्ट-ट्रॅक कोर्टात सहा महिन्यांत निकाली काढावेत.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊन समाजात आदर्श निर्माण करावा.
दरम्यान, लहान बालकाचे आजोबा यासीन खान व इमरान पटेल यांचे वडील युनूस पटेल यांचे पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. सुप्रीम कोर्टाचे सायटेशन, पेनड्राईव्ह व इतर गोपनीय कागदपत्रेही एकता संघटनेकडून सादर करण्यात आली. त्यात नमूद आरोपींवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक धारबळे यांनी शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, अन्वर शिकलगर, अनिस शाह, ॲड. आवेश शेख, युनूस पटेल (दहीगाव), यासीन खान (यावल), जफर शेख, करीम मेंबर तसेच दहीगाव व यावल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





