आदिवासी विद्यार्थ्यांना बोली भाषेतून शिक्षण देण्याची गरज – मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित
यावल येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
जळगाव l ९ ऑगस्ट २०२३ l आदिवासी विद्यार्थ्यांना बोली भाषेतून शिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी आज येथे व्यक्त केले.
यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अंकित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार शिरीष चौधरी, न्याय विधी विभागाचे जिल्हा सचिव श्री. सय्यद, यावल न्यायालयाचे न्यायाधिश श्री.वाळके ,यावल तहसीलदार, श्रीमती मोहनमाला नाझिरकर, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड, यावल वनपरिक्षेत्र अधिकारी (पुर्व )अजय वावने व पश्चिम विभागाचे सुनिल भिलावे आदी उपस्थित होते.
श्री.अंकित यावेळी म्हणाले, कालानुरूप आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणे जितके गरजेचे आहे. तेवढेच त्यांच्या शिक्षण अभ्यासक्रमात बोली भाषेचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद अंर्तगत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची ही त्यांनी यावेळी माहिती दिली.
यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “मेरी माटी, मेरा देश’ ‘ या अभियानांतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांनी पंच प्रण शपथ घेतली. यावेळी एकाच दिवशी 9000 वृक्षांचे रोपण करण्यात आले .
आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेतलेल्या १० वी १२ वीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमाकांने उत्तीर्ण विद्यार्थ्याचे तसेच वैद्यकीय अभासक्रमात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व पुस्तकांचा संच देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर चोपडा, रावेर, यावल येथील विद्यार्थी – विद्यार्थीनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. आभार सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदिवासी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.