
रसलपुरात गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; तीन आरोपी अटकेत
१७५ किलो गोमांस व धारदार हत्यारे जप्त; रावेर पोलिसांची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रसलपुर येथील कुरेशी मोहल्ल्यात अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर छापा टाकत तिघांना अटक केली. या कारवाईत सुमारे १७५ किलो गोमांस व धारदार हत्यारे जप्त करण्यात आले आहेत.
गुप्त माहितीवरून छापा
गुप्त बातमीदारामार्फत रावेर तालुक्यातील रसलपुर गावातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. १० मार्च रोजी पहाटे रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.
पिता–पुत्रांसह तिसरा आरोपी अटकेत
छाप्यादरम्यान शेख युसुफ शेख अस्युब कुरेशी (वय ५०) आणि शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी (वय २५) हे पिता–पुत्र गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापून विक्री करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.
दरम्यान, शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा सुरुवातीला पसार झाला होता; मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवून त्यालाही नंतर अटक केली.
मांस व हत्यारे जप्त
या कारवाईत आरोपींकडून एकूण १७५ किलो गोमांस (अंदाजे किंमत ३१ हजार रुपये) तसेच धारदार कोयते जप्त करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत नमुने घेऊन जप्त मांसाची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून रावेर पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ (सुधारीत २०१५) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, गजानन बोने, राहुल परदेशी, शुभम काळे यांनी केली.




