
लाचप्रकरणी वनपाल, सॉ मिल मालकासह तिघांवर गुन्हा; एका आरोपीला अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पारोळा (प्रतिनिधी) : शेतातील निंबाची झाडे तोडून ही लाकडे ट्रकद्वारे मालेगावकडे नेत असताना वनविभागाच्या अधिकार्यांनी ट्रक अडवून गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून अडीच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तडजोडीनंतर एक लाख रुपयांवर व्यवहार ठरला असला तरी संशयितांना सापळ्याची कल्पना मिळाल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र लाच मागणीचा अहवाल मिळाल्यानंतर एसीबीने पारोळा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणामुळे लाचखोरांच्या वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा वनपाल वैशाली गायकवाड, पारोळ्यातील श्रीकृष्ण सॉ मिलचे मालक सुनील धोबी आणि वनविभागातील एका कर्मचाऱ्याविरोधात (नाव अद्याप समोर आलेले नाही) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुनील धोबी यांना अटक केली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
घटनेचा तपशील असा की, तक्रारदाराच्या भावाने शेतातील निंबाची झाडे तोडून ती लाकडे मालेगावात नेण्यासाठी ट्रकची व्यवस्था केली होती. मात्र १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सावित्री फटाक्या चौकाजवळ वनपाल गायकवाड, सुनील धोबी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ट्रक अडवून तो श्रीकृष्ण सॉ मिलमध्ये लावून ठेवला. त्यानंतर तक्रारदाराने ट्रक सोडविण्याची विनंती केल्यावर आरोपींनी अडीच लाख रुपयांची मागणी केली आणि शेवटी एक लाख रुपयांवर तडजोड केली.
तक्रारदाराने हा प्रकार थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) कळविला. एसीबीने सापळा रचला, मात्र आरोपींना सापळ्याची कुणकुण लागल्याने त्यांनी लाच स्वीकारण्यास नकार दिला. तरीसुद्धा लाच मागणीचा ठोस अहवाल मिळाल्याने एसीबीने बुधवारी सायंकाळी तिघांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीच्या निरीक्षक नेहा सूर्यवंशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, नाईक राकेश दुसाने, नाईक बाळू मराठे, नाशिकचे हवालदार विनोद चौधरी, चालक परशूराम जाधव, नंदुरबारचे हवालदार नरेंद्र पाटील आणि नाईक सुभाष पावरा यांच्या पथकाने केली.





