
महापालिकेच्या ३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे खांदेपालट
आयुक्त ढेरे यांचे आदेश; विविध विभागांना नवी जबाबदारी, कामकाजाला गतीचा प्रयत्न
जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अभियंता, लिपिक आणि शिपाई संवर्गातील तब्बल ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. महानगरपालिकेवर नवीन लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या करण्यात आल्याने पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महत्त्वाच्या विभागांत फेरबदल
आयुक्त ढेरे यांनी काढलेल्या आदेशानुसार, नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये रचना सहाय्यक अतुल पाटील यांच्याकडे निमखेडी ते आव्हाणे, पिंप्राळा शिवार सुधारित विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता राजेंद्र पाटील यांच्याकडे बांधकाम प्रभाग अधिकारी पदासह मेहरूण शिवार व टीडीआर प्रकरणांची जबाबदारी दिली आहे. सर्व्हेअर विजय मराठे जळगाव व खेडी शिवारातील नगररचना विभाग आणि बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळतील, तर सर्व्हेअर समीर बोरोले यांच्याकडे आरोग्य विभागात सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांना मदत करण्यासाठी सहाय्यक अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
लिपिक संवर्गावर नवीन जबाबदाऱ्या
प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी १५ लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने विशाल सुर्वे यांच्याकडे घनकचरा प्रकल्प अभियंता, अमृत मलनिस्सारण, रमाई आवास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आहे. गौरव सपकाळे यांच्याकडे प्रभारी अधीक्षक (मार्केट वसुली) आणि विधी विभागाचा अतिरिक्त कार्यभार, तर मनोज शर्मा यांच्याकडे प्रभाग अधीक्षक (समिती १), घरकुल आणि किरकोळ वसुली विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
शिपाई आणि इतर कर्मचाऱ्यांच्याही बदल्या
स्थायी समिती सभापती कार्यालयातील प्रसाद पाठक यांची मालमत्ता व्यवस्थापन विभागात, तर निखिलेश तिवारी यांच्याकडे अर्थ विभागासह विधी विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. याशिवाय मनोज भालेराव, खेमराज बाविस्कर, कैलास कोष्टी, चंद्रकांत जगदाळे, नरेंद्र मसाने, नरेंद्र श्रावणे, निखील सोनवणे, संगिता शिरसाठ, दुर्गा जाधव, सुनंदा फडके, रविंद्र अहिरे आणि धीरज शेटे आदी कर्मचाऱ्यांचाही बदलीपात्र कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने नवीन विभागात कार्यभार स्वीकारून त्याचा अहवाल सादर करावा. या फेरबदलांमुळे प्रलंबित फाईल्सचा निपटारा होऊन महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





