
संघभावनेतूनच वैयक्तिक कौशल्याला वाव : राजेंद्र पवार
अखिल भारतीय विद्युत क्रीडा स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही खेळात विजय मिळवण्यासाठी संघभावना अत्यंत महत्त्वाची असते. खेळाडूंनी एकजुटीने, सहकार्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळल्यास प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला योग्य संधी मिळते. देशातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्युत कंपन्यांतील खेळाडूंचा वाढता सहभाग आणि नावलौकिक ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.
बालेवाडी (पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये एमएसईबी होल्डिंग कंपनीतर्फे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो आणि बास्केटबॉल स्पर्धांचे उद्घाटन बुधवारी उत्साहात पार पडले. महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) सुनील काकडे होते.
व्यासपीठावर आयोजन समितीचे उपाध्यक्ष व मुख्य अभियंता अनिल कोलप, अशोक घाडगे, मुख्य अभियंता धनराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, पुरुषोत्तम वारजुरकर, विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश राय, सरचिटणीस नरेश कुमार, उपाध्यक्ष भरत पाटील आणि खजिनदार ललित गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळ हे देशातील सर्व विद्युत कंपन्यांतील खेळाडूंना एकत्र आणणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. विविध राज्यांतील खेळाडूंमध्ये संवाद, स्पर्धात्मकता आणि क्रीडाभावना वाढीस लागण्यास या स्पर्धांचा मोठा हातभार लागत आहे.
प्रादेशिक संचालक सुनील काकडे यांनी सांगितले की, विद्युत क्षेत्रातील कामकाज तणावपूर्ण आणि धकाधकीचे असते. त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धांमुळे कर्मचारी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनतात. मैदानावरील शिस्त आणि संघभावना कार्यालयीन कार्यक्षमतेतही सकारात्मक बदल घडवून आणते.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात विविध राज्यांतील खेळाडूंनी आकर्षक संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्लीसह विविध राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ सहभागी झाले असून सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहेत.





