
वाढत्या उष्णतेमुळे आरटीओ कार्यालयाच्या वेळेत बदल; आता सकाळी ८ पासून कामकाज
जळगाव: जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून उष्माघाताचा धोका लक्षात घेता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) आपल्या कामकाजाच्या वेळेत तात्पुरता बदल केला आहे. वाहन परवाना चाचणी आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता कार्यालयाची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या व पक्क्या लायसन्सची चाचणी तसेच इतर कामांसाठीच्या अपॉइंटमेंट आता सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेतच दिल्या जातील. वाढत्या तापमानामुळे वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी नवीन वेळेनुसार आपल्या कामांचे नियोजन करावे, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





