गुन्हेजळगांवसामाजिक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘महावितरण’चा डंका; १५ वर्षांनंतर कबड्डीचे विजेतेपद खेचून आणले!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘महावितरण’चा डंका; १५ वर्षांनंतर कबड्डीचे विजेतेपद खेचून आणले!

​चार सांघिक विजेतेपदांसह अष्टपैलू वर्चस्व; बालेवाडीतील ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेचा दिमाखदार समारोप

​जळगाव/पुणे (प्रतिनिधी):
एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणच्या खेळाडूंनी मैदानावर अक्षरशः वादळ निर्माण केले. महिला व पुरुष गटातील कबड्डी, खो-खो आणि कुस्तीमध्ये महावितरणने तब्बल चार सांघिक विजेतेपदे आणि एक उपविजेतेपद पटकावत राष्ट्रीय स्तरावर आपले एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले.

विशेष म्हणजे, पुरुष कबड्डी संघाने बलाढ्य हिमाचल प्रदेशचा पराभव करत १५ वर्षांचा दुष्काळ संपवून सुवर्णपदकावर नाव कोरले.
​अंतिम सामन्यात रंगला अटीतटीचा थरार
​पुरुष कबड्डीचा अंतिम सामना हा या स्पर्धेतील आकर्षणाचे केंद्र ठरला. मागील वर्षीचा विजेता हिमाचल प्रदेश आणि महावितरण यांच्यात झालेल्या या सामन्यात राष्ट्रीय खेळाडूंची फौज मैदानात होती. सुरुवातीला हिमाचल प्रदेशने ६-२ अशी आघाडी घेतली होती, मात्र महावितरणच्या नीलेश ठाकूर याने एकाच चढाईत हिमाचलच्या दोन गड्यांना बाद करून सामन्याचे चित्र पालटले.

​कर्णधार अमित जाधव यांच्या नेतृत्वाखाली अभिषेक नर, अजय शिंदे आणि रजत गोमासे यांनी रचलेल्या मजबूत बचाव फळीसमोर हिमाचलचे चढाईपटू हतबल ठरले. मध्यंतराला १७-१३ अशी आघाडी घेणाऱ्या महावितरणने अखेर ३४-२४ अशा फरकाने हिमाचलवर मात करत ऐतिहासिक विजय मिळवला. या यशात प्रशिक्षक नीलेश नाईक व व्यवस्थापक रामगोपाल अहिर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
महिला गटात उपविजेतेपद
​महिला कबड्डीच्या अंतिम फेरीतही महावितरण आणि हिमाचल प्रदेश यांच्यातच लढत झाली. मात्र, हिमाचल प्रदेशने सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम ठेवत महावितरणचा २१-१२ असा पराभव केला. त्यामुळे महावितरणच्या महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दिग्गजांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण
​बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या समारोप सोहळ्यात संचालक (प्रकल्प) दत्तात्रेय पडळकर, सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, आणि आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील काकडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी मुख्य अभियंते अनिल कोलप, दत्तात्रेय बनसोडे, स्वप्निल काटकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button