खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई; भाजप महिला मोर्चाकडून अभिनंदन

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई; भाजप महिला मोर्चाकडून अभिनंदन

जळगाव : सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आभार मानण्यात आले आहेत.

महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वाईन शॉपसमोर, सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहनांमध्ये बसून मद्यपान करणाऱ्या तब्बल ६२ जणांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरून या मोहिमेत सहभागी झाल्याने पोलिसांच्या कारवाईची दखल नागरिकांनी घेतली.

महिला मोर्चाच्या मते, सार्वजनिक ठिकाणी मद्यपींकडून होणाऱ्या उपद्रवामुळे महिला, माता-भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. गिरणा टाकीसारख्या गर्दीच्या भागात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाही या प्रकारांचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी घेतलेली कडक भूमिका महिलांसाठी दिलासादायक ठरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या वाईन शॉप चालकांवर करण्यात आलेली कारवाईही कौतुकास्पद असल्याचे महिला मोर्चाने म्हटले आहे. या मोहिमेमुळे टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक बसेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

महिलांच्या सुरक्षेसाठी अशाच प्रकारच्या धडक मोहिमा पुढेही सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. नितू महेंद्रसिंग परदेशी, नगरसेविका सौ. उज्वला बेंडाळे, श्रीमती रेखा वर्मा, सौ. संगीता पाटील, सौ. ज्योती पालीवाल यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button